Marathi Kavita on Cricket and

स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला…।।
काम नाय हाताला
भाकर नाय पोटाला
तोंड वर करुन काय
इचारतो मला…..???
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला…..।।

युवराजच्या फटक्याला
वाजवतो टाळ्या
अन सचिन च्या शतकाला
फटाक्यांच्या माळा…
प्यान्ट फाटली ढुंगनावर
ठिगाळ नाय त्याला
अन तोंड वर करुन काय
इचारतो मला…??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला…।।

एका एका जाहिरातीचे
करोडो घेती
तोंड रंगवुन येती
कधी तोंड रंगवुन जाती..
टीवी च्या चैनल वर
सचिन पुन्हा येतो
चुना लावून येतो कधी
चुना लावून जातो..
बूस्ट घ्या बिअर घ्या
दूध मागु नका
पेप्सी घ्या कोला घ्या
पाणी मागु नका…
पिज्जा घ्या बर्गर घ्या
भाकर मागु नका…
थोबाड त्यांच बघुन
फायदा काय तुला
अन तोंड वर करुन काय
इचारतो मला..??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला…।।

आय पी एल नावाच
आणले नव सॉन्ग
खेळाडूंची झाली विक्री
लाउनि रांग…
काळा पैसा पांढरा करतो
आय पी एल वाला
न अर्थकरण कळणार कधी
आपल्या देशाला…
खेळ कुठे राहिला सारा
बाजार झाला
नी क्रिकेट नावाचा
आजार झाला
या आजारान घेरलया
उभ्या देशाला
अन तोंड वर करुन काय
इचरतो मला…??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला…।।

मीच आता काही
विचारतो तुला
खरे खरे सांगायचे
स्कोर काय झाला…

बलात्कार झाले कितीे
स्कोर काय झाला…
दंगली मधे मेले कितीे
स्कोर काय झाला…
कामगारांना पिळले कितीे
स्कोर काय झाला…
दलिताना छळले कितीे
स्कोर काय झाला…
बेकारांची गर्दी कितीे
स्कोर काय झाला…
शेतकरी मेली कितीे
स्कोर काय झाला…
स्विस बैंकेत पैसा का
स्कोर काय झाला…
गरिबाना मारले का
स्कोर काय झाला…
बालगुन्हे वाढले कितीे
स्कोर काय झाला…
जंगल जमीन हडपलीे
स्कोर काय झाला…
उभा देश जळतोया
जाण नाही तुला
न तोंड वर करुन काय
इचारतो मला…??
स्कोर काय झाला…
सांगा स्कोर काय झाला
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला…

——-  शीतल साठे

4 Replies to “Marathi Kavita on Cricket and”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *